Ad will apear here
Next
स्वतःतलं अवखळ मूल जपलेला बाबा...
मी बाबावर लिहिलेल्या पुस्तकाची पहिली प्रत कौतुकाने बघताना...

दर वर्षी बाबा ऑगस्टच्या २६ तारखेला सकाळी फोन करतो आणि म्हणतो, ‘आज माझा वाढदिवस आहे मला विश कर.’ आणि मला ही त्याची सांगण्याची कल्पना खूपच आवडली. आज मात्र सकाळी फोन वाजला नाही आणि मी आळस झटकून बाबाला फोन लावला. शुभेच्छा दिल्या. त्याचा नेहमी येणारा उत्साही आवाज ऐकला. एकदम भारी वाटलं.

बाबाचे किती मित्र-मैत्रिणी, मुलं-मुली.. मोजायचे ठरवले तर अशक्यच होईल. माझे वडील २१ ऑगस्ट १९९१ रोजी कॅन्सरनं गेले. त्या वेळेपासून छत नाहीसं होणं म्हणजे काय, आयुष्यातली पोकळी म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं अनुभवलं होतं; पण बाबा भेटला आणि म्हणाला, ‘मला ए बाबा अशीच हाक मारायची.’ पहिल्याच भेटीत त्यानं माझं पालकत्व घेतलं होतं.

बाबाचं नवीन पुस्तक आल्यावरचा संवाद...

एकदा मी त्याला भेटायला गेले असताना कोणी तरी आलेलं होतं, तेव्हा म्हणाला, ‘ही माझी मुलगी दीपा.’ त्या क्षणी गेलेलं छप्पर पुन्हा डोक्यावर आल्यासारखं वाटलं. एकदम लै भारी वाटलं.

बाबाबरोबरच्या सगळ्याच आठवणी जपून ठेवण्यासारख्या आहेत. त्याला भेटायला गेल्यावर तो माझा आवडता राग विसरत नाही आणि लगेचच त्यातली बंदीश गाऊन दाखवणार, खूपच मूड असेल, तर ‘चल छैया छैया छैया’ हे गाणं गात राहणार. कधी मला ‘तू गालातल्या गालात हसतेस, चल दात दाखवून मोकळं हस’ असं सांगणार आणि हसायला लावणार.

बाबा आणि मी कव्वाली गाताना...

त्याच्याबरोबर प्रवास करताना तर नुसती मजाच मजा. एकदा आम्ही मुंबईहून पुण्याला एकत्र आलो, तेव्हा संपूर्ण प्रवास आम्ही गाणी जोरजोरात म्हटली. तो गाणी गायचा आणि मी वैभवच्या कविता. त्यातल्या काही कविता त्यानं माझ्याकडून शिकूनही घेतल्या. काही वेळा मी त्याच्याबरोबर ‘मुक्तांगण’ला गेले, तेव्हा तर गाडीमध्ये ताजा हिरवागार हरभरा, बोरं, पेरू, मटार या सगळ्यांचा भरभरून साठा आणि मग गप्पा मारत बकरीच्या स्पीडनं तो खायचा.

घरी तर ताकातली भाकरी असो की चिवडा, तुम्ही तृप्त होऊनच तिथून परतणार; पण तरीही त्याच्यातलं अवखळ मूल कधी जागं होईल याचा नेम नसतो. स्वत:ला चहा सांगताना तो म्हणणार, ‘मला चहा कर. हिच्यासाठी चहा वगैरे अजिबात करू नकोस.’ (मी चहा पीत नाही हे त्याच्या लक्षात असतं तरीही.) एकदा ‘बुकगंगा’मध्ये आमच्या दोघांशी गप्पा असा कार्यक्रम होता आणि त्या वेळी ‘बुकगंगा’च्या सुप्रिया लिमयेनं कार्यक्रम शेवटाकडे आलेला असताना मला एखादी कविता किंवा गाणं गायचा आग्रह केला. त्या वेळी बाबा लगेच म्हणाला, ‘मी पण कविता म्हणून दाखवणार.’ मग मी म्हटलं, ‘आधी तूच म्हण, नंतर मी म्हणून दाखवेन.’ त्यानंही त्या वेळी एकाऐवजी दोन-तीन कविता छान गाऊन दाखवल्या. त्याच्यातलं मूल जरी खट्याळ असलं, तरी ते त्रासदायक नाही.

माझ्या वाढदिवशी मला 'वाडेश्वर'मध्ये ट्रीट देताना बाबा...

ओरिगामीचं नवीन काही केलं, की पुन्हा एकदा सगळ्या घड्या उलगडून मला नव्यानं करून दाखवणार आणि मीही त्यातलं मला फार कळतं अशा आविर्भावात ते किती छान जमलंय असं सांगणार. अशा ओरिगामीच्या किती तरी कलाकृती त्यानं मला ताबडतोब करून दिलेल्या आहेत. अपूर्वच्या फोटोग्राफीचं मनापासून कौतुक त्याला असतं.

ख्रिसमसचा सांताक्लाज जसा हवाहवासा वाटतो, तसाच हा बाबा लईच गोड आहे. सांता तरी वर्षातून एकदा भेटतो; पण आमचा बाबा मात्र सतत आमच्या बरोबर असतो.

वाढदिवसाच्या आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

- दीपा देशमुख

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QXGZCP
Similar Posts
‘नितळपणे भेटणारा माणूस’ एखादी छोटेखानी घरगुती अशी शास्त्रीय संगीताची मैफल असो किंवा भल्यामोठ्या सभागारातली एखाद्या स्टार कलावंताची मैफल असो, एखादी मुलाखत असो अथवा एखादे व्याख्यान, साहित्यिक कार्यक्रम असो किंवा काव्यवाचनाचा जलसा असो, त्या कार्यक्रमाला उपस्थित असेल तर एक व्यक्ती बरोबर आणलेल्या स्केच पॅडवर एक तर चित्रे तरी काढत
हाडाच्या कार्यकर्त्या, संवेदनशील लेखिका – दीपा देशमुख प्रसिद्ध लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख यांचा २८ ऑक्टोबर हा जन्मदिन. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या औचित्याने दीपाताईंची जिवाभावाची मैत्रीण डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ यांनी लिहिलेला, दीपाताईंची वाटचाल उलगडणारा लेख त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. कार्यक्रमाचा व्हिडिओही शेवटी दिला आहे
आनंदयात्री अप्पा आज सकाळी पुस्तकवेड्या अप्पांचा फोन आला, ‘मी अर्ध्या तासात येतोय.’ मी या म्हटलं आणि उपमा करण्याच्या तयारीला लागले. काही वेळात दारावरची बेल वाजली. अप्पांच्या अंगात टी-शर्ट, दाढी वाढलेली... त्यांच्या हातात बासुंदीचं पाकीट होतं. अर्थातच, अप्पा नेहमीच काही ना काही घेऊन येतात. कधी चितळेंचे डिंकाचे लाडू, तर कधी खरवस, कधी बासुंदी, तर कधी ताजा ढोकळा
कविमनाचे डॉ. आ. ह. साळुंखे! ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा जन्मदिन (१४ ऑक्टोबर) नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, प्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेला हा लेख...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language